घरातील किरकोळ कारणावरून वाद किती टोकाला जाऊ शकतो, याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथे समोर आली आहे. भाजीमध्ये मीठ जास्त असल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत पतीने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर गॅसवर गरम केलेल्या लोखंडी सळईने पत्नीच्या उजव्या हाताला चटका दिल्याचा आरोप विवाहितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.
बोरगाव काकडे येथील वैष्णवी प्रमोद टाले यांनी अमडापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिचे पती प्रमोद प्रल्हाद टाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद टाले हे चिखली पंचायत समितीत संपर्क सहायक पदावर कार्यरत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, प्रमोद टाले यांना दारू पिण्याची सवय असून, दारूच्या नशेत घरगुती कारणांवरून पत्नीला शिवीगाळ, मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास प्रमोद टाले हे दारूच्या नशेत घरी आले. त्यावेळी पत्नीने त्यांना जेवण वाढले. मात्र, भाजीमध्ये मीठ जास्त असल्याचे सांगत त्यांनी पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
वैष्णवी यांनी शिवीगाळ करू नका, असे सांगितल्यानंतर पतीने त्यांना काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर गॅसवर गरम केलेली लोखंडी सळई उजव्या हातावर ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीमुळे वैष्णवी यांनी आरडाओरड केल्यानंतरही पतीने त्यांना सोडले नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दोन्ही हातांवर तसेच डाव्या खांद्याखाली चावा घेत मारहाण केल्याचे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
या घटनेनंतर वडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता पतीने फोन करू दिला नाही, असेही तक्रारीत नमूद आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वैष्णवी यांनी वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्या वडिलांसोबत अमडापूर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आणि पतीविरुद्ध तक्रार दिली.
पती दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करत असल्याने त्यांच्या भांडणात कोणीही हस्तक्षेप करत नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पतीकडून आपल्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त करत वैष्णवी यांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
या तक्रारीच्या आधारे अमडापूर पोलिसांनी प्रमोद प्रल्हाद टाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिस तपासानंतर या घटनेतील आरोपांबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.
📲 बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews WhatsApp ग्रुपला जॉईन करा
संबंधित बातम्या
- काजूकतलीचा बॉक्स उघडताच धक्का! बुरशीच्या थरात चक्क जिवंत अळ्या; बुलढाण्यात FDA पथकाची रिलायन्स मॉलवर धडक
- ACB चा मोठा सापळा! प्राचार्यासह ५ जण १.५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या लाभासाठी मागितली होती लाच
- धक्कादायक! पदभार सोडलेल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीवर ग्रामपंचायतीतून निधीची उचल?; गटविकास अधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्न
तुमच्या परिसरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा!
तुमच्या गावातील किंवा परिसरातील महत्त्वाची घटना, बातमी किंवा समस्या असल्यास KattaNews टीमशी संपर्क साधा.










