साखरखेर्डा (प्रतिनिधी): समाधान सरकटे
परिसरातील ७५ गावांसाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या साखरखेर्डा येथील बसस्थानकाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावाच्या वाढत्या विस्तारासह प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अद्यापही सुसज्ज बसस्थानकाची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देत साखरखेर्ड्यात तातडीने सुसज्ज मिनी बसस्थानक उभारण्याची मागणी केली आहे.
सुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्या असलेल्या साखरखेर्डा गावात जिल्हा सहकारी बँक, भारतीय स्टेट बँक, १२ पतसंस्था, पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद व खासगी शाळा, माध्यमिक विद्यालये, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, दोन पेट्रोल पंप तसेच मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. याशिवाय नव्याने मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय लवकरच सुरू होणार असून ग्रामीण रुग्णालयाची इमारतही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या गावात परिसरातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते.
मात्र, एवढे महत्त्व असूनही बसस्थानकाची सुविधा अत्यंत अपुरी असल्याने प्रवाशांना उन्हात, पावसात आणि थंडीत उभे राहून बसची वाट पाहावी लागते. महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधाही नसल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकासाठी जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे हा विषय अद्याप मार्गी लागू शकलेला नाही.
या पार्श्वभूमीवर उपलब्ध जागेवरच आधुनिक सुविधांनी युक्त मिनी बसस्थानक उभारण्यात यावे, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसथांब्यासाठी शेड आणि प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी अंकुर देशपांडे यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.
साखरखेर्ड्याचे वाढते महत्त्व आणि परिसरातील ७५ गावांतील नागरिकांची दैनंदिन ये-जा लक्षात घेता या मागणीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
📲 KattaNews WhatsApp ग्रुप जॉईन करा
महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, शेती, नोकरी आणि आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
📰 संबंधित बातम्या
📢 तुमच्या गावातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा!
अपघात, गुन्हे, सामाजिक उपक्रम, शासकीय योजना, राजकीय घडामोडी किंवा आपल्या परिसरातील कोणतीही महत्त्वाची बातमी KattaNews.in ला पाठवा. तुमची बातमी लाखो वाचकांपर्यंत पोहोचू शकते.
KttaNews.in – महाराष्ट्रातील विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल
















