Jammu kasmir bus attack : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात शिवखोडी या तीर्थस्थळावरून परतत असलेल्या बसवर रविवारी सकाळी संशयित अतिरेक्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर बस दरीत मध्ये कोसळून १० जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितले की, ही बस रियासीवरुन कात्राच्या दिशेने निघाली होती. सकाळी सहाच्या सुमारास बसवर संशयित अतिरेक्यांनी गोळीबार केला. हल्ल्यानंतर ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत १० जण मरण पावले आहेत. जखमी झालेल्या ३३ जणांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू केले, मरण पावलेल्या कुणाचीही ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मदत आणि बचावकार्य दोन तास चालले.
शोधमोहीम सुरू | Jammu kasmir bus attack
या प्रकारानंतर पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या मदतीने परिसरात जोरदार शोधमोहीम सुरू केली आहे. अतिरेक्यांचा पकडण्यासाठी धाडसत्र सुरू आहे. हल्लेखोर संशयित अतिरेकी परिसरात राजौरी, पूँछ आणि रियासी या परिसरात लपून राहणाऱ्यांपैकी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.