
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
वाशीम : मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा -2 या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर एक शैक्षणिक उठाव शिक्षण क्षेत्राने अनुभवला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा भाग एक च्या अभूतपूर्व यशानंतर प्रशासनाच्या वतीने या महत्त्वकांक्षी व दूरदर्शी योजनेचा टप्पा 2 राबविण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी या योजनेअंतर्गत भाग एक मध्ये शाळांच्या भौतिक सुविधांची तपासणी झाली व त्या अंतर्गत राज्यभरातून केंद्र स्तर ते राज्यस्तरापर्यंत अनेक शाळांनी आपल्या भौतिक सुविधा परिपूर्ण करून स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी करून मोठ्या,घसघशीत रकमेची बक्षिसे मिळविली. यावर्षी या योजनेचे स्वरूप संपूर्णपणे बदलविण्यात आले होते.
१५० गुणांची ही स्पर्धा शाळेतील शैक्षणिक दर्जा, शाळेचे समाजाभिमुख काम, समाजाप्रती शाळेची असलेली नैतिक जबाबदारी,विद्यार्थी केंद्रित विविध उपक्रम, वृक्षारोपण, स्काऊट गाईड, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, गणित, भाषा आणि विज्ञान विषयाची अध्ययन-अध्यापन चाचणी, शिक्षकांची गुणवत्ता, दिव्यांगांना शैक्षणिक प्रवाहात सामावून घेणे, विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरता केलेले प्रयत्न अशा विविध उपक्रमांची पडताळणी करून ज्या शाळा सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील त्या शाळांना केंद्रस्तरांपासून तर राज्यस्तरापर्यंत शासनाने सन्मानित करण्याचा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -2 या माध्यमातून राबविला. उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याने सुद्धा या उपक्रमात आपला सहभाग नोंदवून जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील नामांकित शाळांनी आपली छाप उपक्रमावर सोडली.
नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून वाशिम जिल्ह्यातून जे.सी.हायस्कूल कारंजाने वाशिम जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला याच बरोबर अमरावती विभागातूनही सदर विद्यालयाने प्रथम प्रथम क्रमांक मिळविला. जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक कानडे इंटरनॅशनल स्कूल वाशीमने तर वाशिम जिल्ह्यातून तृतीय क्रमांक श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम द्वारा संचलित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भर जहागीरने पटकविला हे विशेष.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे ग्रामीण भागातील एक अग्रगण्य विद्यालय असून नेहमीच या ठिकाणी असलेल्या सुविधांच्या आधारे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम विद्यालयामधून होत असते शिवाजी विद्यालयाने या उपक्रमांमध्ये मागच्या वर्षीही तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला होता हे विशेष.
यावर्षी विद्यालयाने पूर्ण ताकतीने तयारी करून रिसोड तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हा स्पर्धेसाठी विद्यालय पात्र ठरले. जिल्हा स्पर्धेमध्येही विद्यालयाने आपली चमकदार कामगिरी दाखवत आपल्या दमदार कामगिरीच्या भरोशावरती तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयामधील परिपूर्ण भौतिक सुविधा,विद्यार्थ्यांची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील दमदार कामगिरी,भौतिक सुविधांची पर्याप्तता, आधुनिक पद्धतीने जतन संवर्धन केलेले शालेय रेकॉर्ड, डिजिटल साधनांचा शैक्षणिक प्रक्रियेत उपयोग, शाळेच्या बोलक्या भिंती व आनंददायी वातावरण, मतदान प्रक्रिया व साक्षरता प्रक्रियेतील उस्फूर्त सहभाग, सरल आणि यु-डायस पोर्टल वरील 100% कामगिरी या या सर्व बाबींच्या भरोशावरती विद्यालयाने यावर्षीच्या माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविल्याने विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यालयाचे प्राचार्य बी.जी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनींनी विद्यार्थ्यांना सोबत घेत व गाव सहभागातून सदर क्रमांक पटकाविला. विद्यालयाचे या क्रमांकाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरणरावजी सरनाईक, उपाध्यक्ष दादासाहेब लाहोरे, उपाध्यक्ष अरुणरावजी सरनाईक, संस्था सचिव भिकाजीराव नागरे, संचालक डॉ. स्नेहदीप सरनाईक, शाळा समितीचे अध्यक्ष महंत रमेश गिरीजी महाराज, संचालक डॉक्टर श्रीरामजी गरकळ,सौ गंगासागरताई चोपडे, अशोक आप्पा काष्टे यांनी अभिनंदन केले आहे. या यशामुळे विद्यालयाच्या गुणवत्तेचा पुन्हा एकदा प्रत्यय येऊन ग्रामीण भागातील या विद्यालयाने कमाल केली अशा प्रकारची प्रतिक्रिया पालक वर्गातून उमटत आहे.