
uddhav thackeray : शिवसेनेत (ठाकरे) इन्कमिंग वाढले असून शिवसेनेची ‘मशाल’ खऱ्या अर्थाने धगधगायला लागली आहे. या धगधगत्या मशालीमध्ये चोरांची टोळी खाक झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करत भविष्यात आपल्या शिवसेनेशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी गद्दारी करण्याचा विचार कोणी स्वप्नातही करणार नाही, या गद्दारांचा दारुण पराभव करा, असे आवाहन शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसैनिकांना केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने (ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला मोठा धक्का दिला.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव तसेच भाजपचे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे महामंत्री स्वप्नील येरुणकर, त्यांच्या पत्नी तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा राणी येरुणकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ठाकरे पुढे म्हणाले, ज्यांनी आमचा पक्ष चोरला, त्या चोरांना सोडून तुम्ही सर्व आमच्याकडे आला आहात, भगवा हाती घेतला आहे. हा भगवा नसून मशाल आहे. ती सोडू नका आणि आपल्या वाटेला येणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना हद्दपार केल्याशिवाय राहू नका.
विनातिकीट आलात तरी मीच टीसी !
अजित यशवंतराव यांच्या प्रवेशादरम्यान बोलताना ठाकरे म्हणाले, तरुण, उमदा, सुशिक्षित आणि मनापासून काम करणारा तरुण शिवसेनेत आला आहे. कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता ते आले आहेत. अनेक जण तिकिटासाठी येतात. तुम्ही ‘विदाऊट तिकीट’ आला आहात; पण टीसी मीच असल्याने तुमचा पुढचा प्रवास सुखकर करण्याची जबाबदारी माझीच आहे. आपल्या मतदारसंघातील उमेदवार कोण आहे, हे सांगायची गरज नाही, असे सांगून ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राजन साळवी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.