
सिंदखेडराजा/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा (sindkhedraja) मतदारसंघ आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेशावर त्यांनी स्वतःचं बुधवारी माध्यमांशी बोलतांना स्पष्टीकरण दिले असून ते येत्या काही दिवसात ‘तुतारी’ हाती घेणार असल्याचे संकेत दिले होते. आपण फक्त निधी मिळावा व मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी अजित दादा बरोबर गेलो होतो.मी शरीराने जरी दादा सोबत असलो तरी मात्र मनाने पवार साहेबांच्या सोबतच आहे.
असे वक्तव्य डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले होते. तुमच्या या विधानामुळे मतदार संघामध्ये एकच संभ्रम निर्माण झाला होता. हाती घड्याळ बांधणार की तुतारी फुंकणार.. परंतु परत एकदा त्यांनी मोठ्या पवार साहेबांचा हात पकडला आहे. व तुतारी फुंकण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी त्यांनी आज पवार साहेबांची भेट घेण्यासाठी मुंबईतील वाय.बी. सेंटर मध्ये ते दाखल झाले आहेत.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीची समिकरणे बदलणार आहेत. बुधवारी माध्यमांशी बोलतांना त्यांनी अजित पवारांना गेल्या एक महिन्यांपासून भेटलो नसल्याचे सांगताना कायर्कर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले होते.मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस अनेक घडामोडी होत्त असून, माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या भूमिकेमुळे अनेक नेते वेट अँड वॉच च्या प्रतिक्षेत होते. तर दुसरीकडे गायत्री शिंगणे तुतारीचा रथ सजवून गावोगावी मीच तुतारीचा उमेदवार असल्याचे सांगून मतदाराच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरू केला होता.
तर दुसरीकडे मी अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबतच असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे ताकदीने काम करून पक्ष जो उमेदवार देणार तो उमेदवार निवडून आणणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड नाझेर काझी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.