Police bharti | नवी मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या एसआरपीएफ SRPF ग्रुप ११ च्या कॅम्प परिसरात भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याची चाचणी सुरू असताना काही उमेदवारांना उलट्यांचा त्रास झाला. त्यांना तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय मिलिंद बिन्हाडे (वय २४) या उमेदवाराचा मृत्यू झाला.
तर, धुळ्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास व्हेंटिलेटरवर ठेवले. चौघांना आयसीयूमध्ये ठेवले आहे. ठाण्यातील शीळफाटा परिसरात एसआरपीएफ भरती सुरू आहे. शनिवारी सकाळी भरती प्रक्रियेतील धावण्याची चाचणी सुरू असताना काही जणांनी चक्कर येणे, उलट्या होणे, अंगात अकड येणे अशा तक्रारी केल्या. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी काहींना रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच अक्षय बिन्हाडे यास रक्ताची उलटी झाली. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले. तर, धुळे येथील प्रेम ठाकरे (२९) याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. पवन शिवाजी शिंदे (२५), अभिषेक शेटे (२४), सुमित किशोर आडतकर (२३), साहिल किशोर लवण (१९) यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.