
neet 2024 : “नीट” पेपरफुटी प्रकरणी नांदेड व लातूरच्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक तसेच देगलूर (जि. नांदेड) व दिल्लीतील एक अशा चौघांविरूद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.नीटप्रकरणी महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाच्या साह्याने माहितीची पडताळणी करणे सुरू आहे.
शनिवारी दोन शिक्षकांना चौकशीसाठी बोलावून नंतर सोडून देण्यात आले होते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाईलवर हॉल तिकीट व काही आर्थिक व्यवहार आढळून आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, त्या माहितीच्या आधारे चौघांविरूद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.
neet 2024| चौकशीतून काय आले पुढे ?
संजय तुकाराम जाधव, जलीलखाँ उमरखान पठाण हे दोघे पैसे घेऊन परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवित असल्याची माहिती कळली. त्यावरुन एटीएसचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील नाईक हे पथकासह शनिवारी लातुरात दाखल झाले.जाधव याने अन्य एक संशयित ईरन्ना मष्णाजी कोनगलवार यास विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे व्हॉटस्अपद्वारे पाठविले. पुढे ईरन्ना कोनगलवार याने दिल्लीतील गंगाधर नावाच्या व्यक्तीला संपर्क केला.
नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल |neet 2024
दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांच्या फिर्यादीवरुन संजय तुकाराम जाधव (रा. लातूर), जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर), ईरन्ना मष्णाजी कोनगलवार (मूळ रा. देगलूर जि. नांदेड ह.मु. आयटीआय उमरगा जि. धाराशिव) आणि गंगाधार (रा. दिल्ली) या चौघांविरोधात केंद्र सरकारने नव्याने केलेल्या पेपरफुटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यात जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर) याला पोलिसांनी रविवारी उशीरा रात्री ताब्यात घेतले आहे