
motala : तालुक्यातील नळंगकुंड शिवारात शेतामधील घरात झोपलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने २६ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. डोक्याच्या बाजूनेच बिबट्याने हल्ला केल्यामुळे जखमीच्या डेक्याला इजा झाली आहे. नळकुंड येथील रहिवाशी सुभाष किसन बावस्कर subhash kisan bavaskar (५५) हे गावा जवळच गट क्रमांक १६ मध्ये आपल्या शेतात घर बांधून रहातात. २५ सप्टेंबर रोजी रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यांनी हवेसाठी एक दार उघडे ठेवले होते. दरम्यान याचवेळी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक घरात प्रवेश करत त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला.
डोक्याच्याच बाजूने बिबट्याने हा हल्ला चढविला होता. दरम्यान जीव वाचविण्यासाठी बावस्कर यांनी आरडाओरड केली असता ‘बिबट्याने’ तेथून पळ काढला होता. या हल्ल्यात सुभाष किसन बावस्कर यांच्या डोक्याला इजा झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेदरम्यान बावस्कर व त्यांच्या पत्नीनेही आरडाओरड केल्यामुळे बिबट्या तेथून पळाला त्यामुळे दोघांचेही एक प्रकारे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश काळे, वनपाल सुधीर जगताप आणी वनरक्षक कैलास तराळ यांच्यासह वनमजुरांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.