
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सुरू असलेल्या एका अवैध सोनाग्राफी सेंटरवर आरोग्य, पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत ३ ऑगस्ट रोजी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध सोनोग्राफी सेंटरचा गोरखधंदा समोर आला असून याचे धागेदोरे आता कुठपर्यंत पोहोचतात या बाबी तपासात उघड होतील. सविस्तर वृत्त असे की मेहकर शहरातील पवनसुत नगरमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
मेहकर येथे एका भाड्याच्या जागेमध्ये हे अवैध सोनोग्राफी सेंटर सुरू होते. शनिवारी दुपारपासून ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी किसन हरिभाऊ गरड (रा. करंजी, ता. रिसोड, जि. वाशीम) व गणेश शिवाजी सुलताने (गुंजखेड, ता लोणार, जि. बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेतले.
या पथकामध्ये डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ज्ञानेश्वर मुळे, अॅड. वंदना काकडे, मनोज जोशी, प्राधिकृत केलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. आर. चव्हाण यांचा सहभाग होता.