रक्षाबंधनाच्या सणाला गुरुभावाने ५० हजारांसठी बहिणीला संपविले

 

नारायणराव आरू पाटील / प्रतिनिधी

 

रक्षाबंधनाच्या सणाला गुरु भावानेच बहिणीला 50000 रुपयांसाठी संपवले उसनवारीने दिलेल्या ५० हजार रुपयांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा गुरुभावाने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला खून केल्याची घटना तालुक्यातील कवठा येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी सीताराम कचरू झिंगरे (वय ७३, रा. कवठा) यास पोलिसांनी सोमवारी अटक केली. जानकाबाई किसन मानमोठे (वय ६५) असे मृतक महिलेचे नाव आहे.

 

 

रिसोड तालुक्यातील कवठा ते पेडगाव मार्गावर असलेल्या एका घराच्या मागे झुडपामध्ये १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती रिसोड पोलिसांना डायल ११२ वर मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील चौकशीला प्रारंभ केला. वाशिम येथून श्वानपथकालाही पाचारण केले होते. याप्रकरणी मृतक जानकाबाई मानमोठे यांचा मुलगा मधुकर किसन मानमोठे याने रिसोड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार जानकाबाई या आरोपी सीताराम कचरू झिंगरे यास गुरुभाऊ मानत होती.

 

 

जानकाबाई यांनी आरोपीला ५० हजार रुपये हातउसने दिले होते. अधूनमधून ती आरोपीकडे पैशाची मागणी करत होती. मात्र, आरोपी हा नेहमीच पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. हातउसने पैसे परत करण्याचा तगादा लावत असल्याचा राग मनात धरून आरोपीने जानकाबाई हिच्या तोंडावर, डोक्यावर जबर मारहाण करून ठार केले. ही घटना १७ ऑगस्टला घडली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. १८ ऑगस्टला सायंकाळी कवठा ते पेडगाव मार्गावरील एका घराच्या मागे झुडपामध्ये मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली.