Latest crime news : प्रेमविवाह केला म्हणून नवविवाहित जोडप्याचं गोळ्या झाडून हत्या !

Latest crime news

Latest crime news : प्रेमविवाह love marriage केला म्हणून जोडप्याची सात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना हरयाणात हिसार जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीकडील ११ लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, तर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी पाच पथके स्थापन केली आहेत.

 

 

बडाला गावातील तेजवीर सिंहमार (वय २८) आणि सुलतानपूर गावातील मीना मलिक (२६) यांचा गाझियाबादमधील ‘आर्य समाज मंदिरात’ नुकताच प्रेमविवाह झाला. या लग्नामुळे मुलीच्या बाजूचे लोक संतापले होते. काही दिवसांपूर्वी मीनाला तिच्या आईच्या तब्येतीची माहिती मिळताच ती पती तेजवीरसह सुलतानपूर येथील तिच्या माहेरी गेली. दोघेही तेथे काही काळ थांबले आणि घरातील सदस्यांनीही संवादादरम्यान सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला.

 

 

मुलीकडील लोकांनी या नवविवाहित जोडप्याला एका उद्यानात बोलाविले. हिसार जिल्ह्यातील हांसी येथील उमरा रोडवर असलेल्या उद्यानात ते आले. यादरम्यान दोन तरुणांनी वादानंतर सात गोळ्या झाडून दोघांची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. लग्नानंतर तेजवीर आणि त्यांची पत्नी मीना यांच्या जीवाला धोका असल्याने ते दिल्लीत राहत होते. सुरक्षेसाठी त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मीनाने सांगितले होते की, तिला सतत धमक्या येत आहेत. मृताचे वडील मेहताब यांच्या तक्रारीवरून हांसी पोलिसांनी मुलीचे वडील, भाऊ आणि काकूंसह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने या वादाचा व्हिडीओही पोलिसांना दिला आहे.