
fraud : तोतया पोलीस, सीबीआय अधिकारी बनून भामट्यांनी लोकांना गंडा घातल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत; परंतु गुजरातमध्ये तर एक भामटा चक्क न्यायाधीश बनून आपल्या बोगस न्यायालयात लोकांचे खटले निकाली काढत होता. पोलिसांनी या बोगस न्यायालयाचा भंडाफोड करत नकली न्यायाधीशाला बेड्या ठोकल्या आहेत. ‘मॉरिस सॅम्युअल ख्रिश्चियन’ असे या बोगस न्यायाधीशाचे नाव आहे. तो २०१९ सालापासून ही तोतयागिरी करत होता. तो स्वतःला मध्यस्थीसाठीच्या लवादाचा न्यायाधीश असल्याचे लोकांना सांगायचा.
न्यायाधीशाच्या कक्षाप्रमाणे असलेल्या एका कार्यालयात बसून तो न्यायनिवाडे करत होता. मॉरिस प्रामुख्याने गांधीनगर परिसरातील जमिनीशी संबंधित वादातच मध्यस्थी करायचा. या बोगस न्यायाधीशाने २०१९ साली अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला होता. हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील सरकारी जमिनीशी संबंधित होते. याचिकाकर्त्याने या जमिनीवर दावा करत सरकार दफ्तरी आपल्या नावाची नोंद करण्याची मागणी याचिकेतून केली होती. मॉरिसने त्या व्यक्तीला आपण सरकारने नियुक्त केलेले मध्यस्थ अधिकारी असल्याचे सांगत खटल्याची बोगस कारवाई सुरू केली.
सुनावणीच्या अखेरीस याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देत त्याने जिल्हाधिकाऱ्याला संबंधित व्यक्तीच्या नावे जमिनीची नोंद करण्याचा आदेशदेखील दिला. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मॉरिसने शहरातील दिवाणी न्यायालयात एका वकिलाच्या मार्फत याचिका दाखल केली आणि सोबत आपला बोगस आदेशदेखील जोडला. मात्र अशा प्रकारचा कोणताही मध्यस्थच नेमला नसल्याचे न्यायालयाचे रजिस्ट्रार हार्दिक देसाई यांच्या निदर्शनास आले. यानंतर देसाई यांच्या तक्रारीवरून या बोगस न्यायाधीशाला अटक करण्यात आली. मॉरिसच्या बोगस कोर्टात काम करणाऱ्या बोगस कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याविरोधात २०१५ सालीही गांधीनगरच्या मणिपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीची एक तक्रार करण्यात आली होती.