
Dikshabhumi : भूमिगत पार्किंगच्या विरोधात दीक्षाभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी केलेल्या आक्रमक आंदोलनाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. काँग्रेसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत यांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी राज्य सरकारतर्फे दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले.
सोमवारी दीक्षाभूमीवर आंदोलन सुरू असताना विधानसभेत नितीन राऊत यांनी हा मुद्दा लावून धरला. दीक्षाभूमी येथे ‘अंडरग्राउंड पार्किंग’ केली जात आहे. त्याला लोकांनी विरोध केला असून, मोर्चा काढला आहे. येथील कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तुपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी केली. याची दखल घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळात तत्काळ येऊन दीक्षाभूमी येथील पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा केली.
सर्वांच्या संमतीने निर्णय
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र, लोकभावनेमुळे त्याला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. एक बैठक घेऊन सर्वाच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल.
आक्रमक भूमिका अनुयायींचा एल्गार
दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगविरोधात आंबेडकरी अनुयायींनी सोमवारी एल्गार पुकारला. आक्रमक भूमिका घेत समाजबांधवांनी पार्किंगचे काम बंद पाडले. ही तीव्र भावना लक्षात घेऊन दीक्षाभूमी स्मारक समितीनेही तातडीने भूमिगत पार्किंग रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. तसे लेखी पत्रही आंदोलकांना दिले.