
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील सैदा सुखल गावाजवळ मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत CRPF एक जवान शहीद झाला, तर सहा जवान जखमी झाले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारातून दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी सुदैवाने बचावले.१ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होत असून त्याच्या १७ दिवसांपूर्वी झालेल्या या हल्ल्यांमुळे सुरक्षा दल सतर्क झाले आहे.
दुसरीकडे दोडा जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान तसेच एक विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) जखमी झाले आहेत. भदरवाह- पठाणकोट मार्गावरील चटरगल्ला परिसरात सुरक्षा दलाच्या चौकीवर मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
२० जून रोजी घरी येणार होते CRPF कबीर दास
कठुआ जिल्ह्यातील सैदा सुखल हे गावाजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान कबीर दास शहीद झाले. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेले कबीर हे २०११ मध्ये सैन्यदलात रुजू झाले होते. त्यांची पत्नी गर्भवती आहे. येत्या २० जून रोजी ते सुट्टी घेऊन गावी येणार होते. मात्र तत्पूर्वीच ते शहीद झाल्याचे वृत्त घरी धडकले.