
Chang e-6 latest mission news : पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने गोळा करण्याकरिता धाडलेले चीनचे चंग ई-६ हे चंद्रयान chang e-6 chandrayan मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप परतले आहे. चीनने हाती घेतलेली ही महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम यशस्वी झाली. चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे.
चीनमधील चंद्रदेवतेच्या नावावरून या चंद्रयानाचे चंग ई-६ हे नाव ठेवण्यात आले होते. या यानाचे प्रक्षेपण ३ मे रोजी चीनच्या हैना प्रांतातून करण्यात आले होते, तर उत्तर चीनमधील सिझिवांग बॅनर परिसरात हे यान मंगळवारी सुखरूप उतरले. त्यानंतर ही चंद्रमोहीम यशस्वी झाल्याचे ‘चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन’ (सीएनएसए) या अंतराळ संशोधन संस्थेने जाहीर केले. चंग ई-६ मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या शास्त्रज्ञांचे व जनतेचे अभिनंदन केले आहे.
याआधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचे चंद्रयान-३ मोहिमेतील प्रज्ञान रोव्हर व लैंडर ऑगस्ट २०२३ मध्ये उतरले होते. तिथे पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता. चद्रावरून आणली दोन किलो माती पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातून चेंग ई-६ने तेथील दोन किलो माती, दगड पृथ्वीवर आणले असण्याची शक्यता आहे. या मातीची तपासणी करून त्याचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांना उपलब्ध करून दिले जातील, असे चीनने म्हटले आहे. चंद्राबाबत सुरू असलेल्या संशोधनामध्ये चेंग ई-६ मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून आणलेल्या मातीच्या नव्या नमुन्यांच्या तपासणीतून जी माहिती मिळेल ती नव्या शोधांना जन्म देणारी असेल, अशी आशा चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी अँड जिओफिजिक्सचे शास्त्रज्ञ यांग वेई यांनी व्यक्त केली आहे.