ग्रामस्वच्छता अभियानासह, स्मार्ट ग्राम सह ग्रामपातळीवर शासकीय योजनांचे गुणात्मक काम लोकसहभागातून करून गावाचा कायापालट करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील १४ जिल्ह्यांतील सरपंचांना दिल्ली येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे.यामध्ये बुलढाणा, पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया, अकोला, हिंगोली, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, चंद्रपूर, जालना, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एका गावाच्या सरपंचाचा समावेश आहे.
१३ ऑगस्ट रोजीच हे सरपंच सहकुटुंब दिल्लीत दाखल होतील. यासोबत निवडक केंद्रीय मंत्र्यांसोबतही त्यांची बैठक होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील स्मार्ट ग्राम म्हणून एक आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे ग्राम शेलगाव बाजार येथील सरपंच सरला अमित खर्चे यांना दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली असून, तसे पत्रही त्यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून आहे. प्राप्त झाले आहे.
शेलगाव बाजार या गावाला केंद्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला असून राज्य शासनाचे स्मार्ट ग्राम पुरस्कार, स्व. आर. आर. पाटील (आबा) सुंदर गाव स्पर्धा, अटल भूजल योजना जिल्हास्तर, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तर, डॉ. आबासाहेब खेडकर विभागस्तरीय पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. या सर्व कामाची दखल घेत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य संस्था जे ग्रामीण भागात नावीन्यपूर्ण व प्रभावी कामासाठी ओळखल्या जातात त्यांच्यामार्फत दिल्ली येथे स्वातंत्र्य दिनासाठी विशेष अतिथी म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.