चूल आणि मूल एवढीच ओळख असलेल्या महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सबलीकरणाची वाट धरत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करत आहेत. परंतु त्यांच्या याच पैशावर कुणी डल्ला मारला असेल याचा तुम्हाला विश्वास सुद्धा येणार नाही अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये घडली. भारत फायनान्स इन्क्लुजन कंपनीचा कर्मचारी महिलांकडून बचत गटाचे चार लाख रुपये घेऊन पसार झाला. याप्रकरणी बोरखेडी पोलिसांनी विकी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की आरोपी विकी लक्ष्मण रोहणकर हा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आडगावचा रहिवासी असून तो बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा या ठिकाणी भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड शाखा नांदुरा या ठिकाणी नोकरीला आहे. विकीने 30 ऑगस्ट रोजी मोताळा तालुक्यातील अंत्री बोराखेडी व डिडोळा या गावातील बचत गटातील महिलांकडून आठवड्याच्या हप्त्याचे ४ लाख ६ हजार ६३३ रुपये जमा करून घेतले.
जमा केलेले ते पैसे नांदुरा शाखेमध्ये रात्री ८ वाजेच्या वाजेपर्यंत भरणे आवश्यक होते. परंतु विकी आणि ते पैसे न भरता मोबाईल मात्र बंद करून जमा केलेली रक्कम घेऊन तो पसार झाला. भारत फायनान्स इन्क्लूजन नांदुरा शाखेतील संदीप गजानन खंडेराव रा. वडगाव ता. संग्रामपूर जि. बुलढाणा यांनी बोरखेडी पोलिसात विकी विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी विरुद्ध कलम ३१६ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.