
Buldhana news : स्थानिक बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने एका महिलेचे ७९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. शनिवारी दि. २० जुलै रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने बुलढाणा शहर पोलिसांत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेड राजा तालुक्यातील वरोडी येथील रहिवासी वंदना गारोळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की शनिवारी गारोळे ह्या मावस भावाच्या नानमुख सोहळ्यानिमित्त बुलढाणा येथे आल्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर, गावी परतण्यासाठी वंदना गारोळे बसस्थानक परिसरात दाखल झाल्या. यावेळी जळगाव लोणार गाडी लागली. दरम्यान, बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्स मधील सोन्याचे किमती दागिने अज्ञाताने लंपास केले. चोरी झाल्याची चाहूल लागताच, गारोळे यांनी आपल्या जवळील पर्स तपासली. तेव्हा त्यामधील किमती सोन्याचे दागिने दिसून आले नाही.
गर्दीचा फायदा घेत, अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर गारोळे यांनी शहर पोलीस ठाणे गाठत पोलिसांसमोर घटना मांडली. पर्समध्ये ठेवण्यात आलेली २० हजार किमतीची सोन्याची गहू पोत, २३ हजार किमतीची साखळी, सोन्याची फुले किंमत ५ हजार, २ हजाराचे जोडवे असे दागिने व इतर साहित्य अज्ञात चोरट्याने चोरी केले असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.