Buldhana news : एका मनोरुग्णावर उपचार करण्यासाठी त्याच्या हातात बेड्या व त्याला साखळदंडाने बांधून अघोरी उपचार aghori upchar करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सैलानी येथे समोर आला आहे. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतिबंध कायदा २०१३ नुसार ५ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे. इरफान शहा रमजान शहा (रा. सैलानी) असे आरोपीचे नाव असून, या प्रकारात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.
यासंदर्भात, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येनोली तांडा येथील वृद्ध महिला सुमनबाई विठ्ठल जाधव यांनी प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार त्यांचा नातू हा ‘मनोरुग्ण’ असून अंगावरील कपडे फाटून टाकतो. त्यामुळे त्याच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. परंतु फरक न पडल्याने त्या सैलानीत मे २०२४ मध्ये आल्या होत्या.
सैलानी येथे उघड्यावरच त्यांच्या कुटुंबीयासह झोपल्या होत्या. तेव्हा इरफान शहा रमजान शहाने त्यांची चौकशी करून आपण येथे सेवा केल्याने आपल्याल्या दिव्य शक्ती प्राप्त झाल्याचे त्यांना सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच सैलानीतच एक रूम भाड्याने करून दिली. या कालावधीत उपचाराच्या नावाखाली तो पैसे घेत होता.