buldhana/motala : बोरखेड येथे कामासाठी जात असताना शेमजुरावर २ अस्वलांचा हल्ला !

buldhana/motala

buldhana/motala : शेतात कामासाठी जात असलेल्या एका शेतमजुरावर जंगलातून आलेल्या ‘दोन अस्वलांनी’ अचानक हल्ला चढविला. यामध्ये ४० वर्षीय शेतमजूर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बोरखेड शिवारात घडली.

 

 

 

मोताळा तालुक्यातील पलढग (कोमलवाडी) येथील रहिवासी शेतमजूर रमेश बर्डे ramesh barde (४०) हे मजुरीसाठी शेतामध्ये जात होते. बोरखेड परिसर हा ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अस्वलांची संख्या मोठी असल्याने अभयारण्यातील अस्वल परिसरामध्ये वावरत असतात. दोन अस्वले शेतशिवारात आली होती आणि रमेश बर्डे शेतात जात असताना, या दोन्ही अस्वलांनी अचानकपणे त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केला असता, शेतात काम करणारे काही लोकं मदतीसाठी धावून आल्याने अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले.

 

 

 

मात्र, या हल्ल्यात रमेश बर्डे गंभीररीत्या जखमी झाले आहे. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच, प्रभारी एसीएफ अभिजीत ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली. दरम्यान, घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामाही केला आहे, यावेळी त्यांच्यासमवेत महिला वनरक्षक जोगदंड, वनपाल प्रफुल्ल मोरे, वनमजूर देविदास बावस्कर, वसंता सावळे व पंच होते. बिट क्रमांक ३१३ मध्येही अस्वलांनी शेतमजुरावर हा हल्ला केला होता.