Thane crime news : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणीचा खून करणारा मोहम्मद अली नासिर हुसेन शेख ऊर्फ ईशान (वय ३५, रा. मुंब्रा) याला अटक केल्याची माहिती डायघर पोलिसांनी बुधवारी दिली. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. मुंब्रा भागात राहणारा ईशान ishan हा पुण्यातील एका मॉलमध्ये कामाला आहे. तो विवाहित असून, त्याला दोन मुलेही आहेत.
त्याचे डायघर भागातील तरुणीशी काही दिवसांपासून ‘प्रेमसंबंध’ होते. तिने यापुढे त्यांच्यातील प्रेमसंबंधाला नकार दिला होता. तो मात्र हे ‘संबंध’ कायम राहण्यासाठी आग्रही होता. यातूनच त्यांच्यात वाद सुरू होते. याचाच राग आल्याने त्याने २ जुलै रोजी तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल राजपूत यांच्या पथकाने आरोपीला बुधवारी सकाळी अटक केली. या खुनामागे आणखी काही कारण आहे का, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे डायघर पोलिसांनी सांगितले.